
चाळीसगाव (रणधीर जाधव, प्रतिनिधी) : –
नगरपरिषद चाळीसगाव येथे आज ४ रोजी नगरपालिकेचे मुख्याधिकारी सौरभ जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली घनकचरा व्यवस्थापन विषयक कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.या कार्यशाळेत आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना शहर स्वच्छतेबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. शहरात कुठेही कचराकुंडी दिसू नये, प्रत्येक प्रभागामध्ये घंटागाडी नियमितपणे जावी, तसेच नागरिकांनी कचरा ओला व सुका वर्गीकृत करूनच द्यावा, अशा सूचना मुख्याधिकारी सौरभ जोशी यांनी दिल्या. नागरिकांनी मिश्र स्वरूपातील कचरा दिल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. यासोबतच शहर स्वच्छतेत नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा असल्याचे सांगून ओला व सुका कचरा वेगळा करूनच घंटागाडीत टाकण्याचे आवाहन त्यांच्याडून करण्यात आले. कार्यशाळेच्या शेवटी “माझी वसुंधरा अभियान” आणि पर्यावरण जनजागृती अंतर्गत शपथ घेण्यात आली व मार्गदर्शन शिबिराचा समारोप करण्यात आला.