सणासुदीच्या दिवसात होणारी; अन्नभेसळ रोखण्याची मागणी
मराठा सेवा संघाने केली मागणी.

चाळीसगाव -(प्रतिनिधी, रणधीर जाधव):-
दिवाळीच्या सणासुदीच्या पार्श्वभूमीवर चाळीसगाव शहरात अन्नभेसळ रोखण्यासाठी तातडीने तपासणी मोहीम राबवावी, अशी मागणी मराठा सेवा संघ व सुज्ञ नागरिकांनी प्रशासनाकडे केली आहे. या संदर्भात जिल्हा अन्न सुरक्षा अधिकारी, जिल्हाधिकारी जळगाव, मुख्याधिकारी चाळीसगाव नगरपालिका तसेच शहर पोलिस निरीक्षक यांना निवेदन देण्यात आले आहे.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, सणासुदीच्या काळात शहरात मोठ्या प्रमाणावर पनीर, खवा, तूप, सुटे खाद्यतेल, फरसाण, पेढे आणि इतर दुग्धजन्य पदार्थांची विक्री होणार आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या अन्न पदार्थात भेसळ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे अशा पदार्थांपासून आरोग्यास घातक रासायनिक घटक वापरले होऊ शकतात. अनेकवेळा पनीर तयार करताना सिंथेटिक दूध,युरिया आणि डिटर्जंट यांसारख्या द्रव्यांचा वापर करून कृत्रिम पनीर तयार केले जातात, ज्यामुळे पचनसंस्था बिघडते व यकृत-मूत्रपिंडावर विपरीत परिणाम होतो. खवा किंवा माव्यात स्टार्च, वनस्पती तूप आणि सिंथेटिक दूध मिसळून बनावट उत्पादने विकली जातात. यामुळे अन्नविषबाधा व लिव्हरचे आजार उद्भवतात. तूपामध्ये परदेशी तेल किंवा व्हेजिटेबल फॅट मिसळून विक्री होऊ शकते, ज्यामुळे कोलेस्ट्रॉल वाढतो आणि हृदयविकाराचा धोका निर्माण होतो. सुट्या खाद्यतेलांमध्ये वापरलेले रिफाइंड तेल किंवा सिंथेटिक मिश्रण मिसळले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.ज्याचा विषारी प्रभाव शरीरावर होतो. तर फरसाण आणि मिठाईत वापरलेले कृत्रिम रंग,सॅक्रिन आणि डिटर्जंट हे घटक कर्करोगास कारणीभूत ठरू शकतात. त्यामुळे प्रशासनाने जनतेच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी केवळ तपासणी मोहीम राबवावी जेणेकरून नागरिकांना चांगल्या प्रकारचे अन्नपदार्थ मिळू शकतील.असा इशारा संघाने दिला आहे.
संघाने प्रशासनाकडे केलेल्या मागण्यांमध्ये चाळीसगाव शहर व तालुक्यातील प्रमुख बाजारपेठांत नमुना तपासणी मोहीम राबवणे, संशयित पदार्थांचे अहवाल सार्वजनिक करणे, दोषींवर FSS Act व IPC नुसार कठोर फौजदारी कारवाई करणे, विना परवाना अन्न व्यवसाय करणाऱ्यांवर कारवाई करणे तसेच नागरिकांना जागरूक करण्यासाठी जनजागृती मोहिमा राबवणे या मुद्द्यांचा समावेश आहे. मराठा सेवा संघाने इशारा दिला आहे की, प्रशासनाकडून तात्काळ कारवाई न झाल्यास जिल्हा स्तरावर आंदोलन छेडले जाईल. भेसळयुक्त अन्न विक्री हा केवळ व्यापारिक गैरप्रकार नसून जनहिताविरुद्धचा गंभीर गुन्हा असल्याचे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.मागील आठवड्यात चाळीसगावात सुटे खाद्यतेल सील करण्यात आले असून त्याचा अहवाल लवकरच प्राप्त होणार आहे. निवेदनावर अरुण शंकर पाटील, समाधान भीमराव पाटील, गोरख साळुंखे, राजेंद्र पगार, योगेश राजधर पाटील, रामलाल चौधरी, कुणाल पाटील, संतोषसिंग राजपूत, शशिकांत पाटील, दिनेश चौधरी, दशरथ शेलार व सुनील पाटील आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.