उत्तर महाराष्ट्रमहाराष्ट्र

शेवटच्या लाडक्या बहिणीला योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी कटिबद्ध – आमदार मंगेश चव्हाण

योजनेचे शिबिर घेणारा चाळीसगाव हा महाराष्ट्रातील पहिला तालुका - प्रांताधिकारी प्रमोद हिले


चाळीसगाव – (रणधीर जाधव, प्रतिनिधी) माझ्यासह इतर लोकप्रतिनिधी यांनी राज्य शासनाकडे केलेल्या पाठपुराव्यामुळे योजनेची वयोमर्यादा ६० वरून ६५, उत्पन्न दाखल्याला रेशनकार्ड तसेच डोमीसाईलला मतदानकार्ड / जन्मदाखल्याचा पर्याय देण्यात आल्यामुळे आता बहिणींना कमीत कमी कागदपत्रे लागणार आहेत.

तरीदेखील बऱ्याच बहिणींची नावे रेशनकार्ड मध्ये नसल्याने या शिबिराच्या माध्यमातून ती अडचण देखील दूर केली जाईल तसेच योजना संदर्भातील ईतर अडचणी देखील सोडविल्या जातील चाळीसगाव तालुक्यातील शेवटच्या बहिणीला योजनेचा लाभ मिळवून देईपर्यंत शिबीर तसेच आमदार कार्यालयाच्या माध्यमातून हे नोंदणी अभियान सुरू राहील असे प्रतिपादन चाळीसगाव मतदारसंघाचे आमदार मंगेश चव्हाण यांनी केले.

ते चाळीसगाव तालुक्यातील माता भगिनींच्या सोयीसाठी छत्रपती शिवाजी महाराज चौक मैदान येथे आयोजित “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना” नोंदणी व मार्गदर्शन शिबिर उद्घाटन प्रसंगी बोलत होते.

यावेळी प्रांताधिकारी प्रमोद हिले साहेब, तहसीलदार प्रशांत पाटील साहेब, बालविकास प्रकल्प अधिकारी सौ.शोभा कापडणे, सौ.तडवी मॅडम, भाजपा तालुकाध्यक्ष प्रा.सुनील निकम, पंचायत समिती माजी सभापती संजय पाटील, शहराध्यक्ष नितीन पाटील, नगरपालिका माजी गटनेते संजय पाटील, जिल्हा सरचिटणीस धनंजय मांडोळे, महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा सौ.संगीता गवळी, मार्केटचे माजी उपसभापती साहेबराव राठोड, संचालक शैलेंद्र पाटील, सरचिटणीस अमोल नानकर, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष गोरख राठोड, निराधार योजना समिती सदस्य दिनकर राठोड, नमोताई राठोड, शिवदास महाजन, छोटुभाऊ पाटील आदी उपस्थित होते.

आमदार चव्हाण पुढे म्हणाले की,

राज्याच्या इतिहासातील सर्वात मोठी योजना म्हणून “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना” भाजपा महायुती सरकारने सुरू केली आहे, या योजनेमुळे कुटुंब सांभाळणाऱ्या माता भगिनींना दरमहा १५०० रुपये म्हणजे वर्षाला १८००० रुपये, ज्या घरात दोन महिला असतील त्यांना ३६००० इतकी भरीव रक्कम अनुदानाच्या माध्यमातून मिळणार आहे. या योजनेमुळे महिला वर्ग मुख्य प्रवाहात येईल व एक मोठी क्रांती होईल असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला.

शिबिरात बहिणींना मिळत आहेत या सुविधा…..

अतिशय अल्पकालावधीत नियोजन करण्यात आलेल्या या शिबीराला प्रचंड असा प्रतिसाद लाभला. तालुक्यातील अंगणवाडी सेविका यांना पंचायत समिती गणनिहाय बैठक व्यवस्था करून देण्यात आली होती त्यात योजनेचे अर्ज भरून घेणे व योजनेची माहिती दिली जात होती. तसेच महसूल प्रशासनाने देखील स्वतंत्र कक्षाच्या माध्यमातून आवश्यक असेल त्यांना रेशनकार्डमध्ये नाव कमी जास्त करून देणे आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. आमदार मंगेश चव्हाण यांच्यातर्फे येणाऱ्या लाभार्थी महिलांना मोफत अर्ज पुरविण्यात येत होते तसेच कागदपत्रे झेरॉक्स देखील मोफत देण्यात येत होते.

चाळीसगाव भागाचे प्रांताधिकारी प्रमोद हिले यांनी प्रास्ताविक मध्ये सांगितले की, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची नोंदणी, मार्गदर्शन, सहाय्यक कागदपत्रे उपलब्ध करून देण्यासाठी आमदार मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली चाळीसगाव येथे आयोजित हे शिबीर राज्यातील पहिले असे शिबीर असून यामुळे योजनेची कमी कालावधीत अंमलबजावणी होण्यास व जास्तीत जास्त महिला लाभार्थ्यांपर्यंत योजना पोहोचण्यास मदत होणार असल्याचे सांगितले.

तहसीलदार प्रशांत पाटील यांनी एलईडी स्क्रीनवर प्रेझेंटेशन च्या माध्यमातून योजनेच्या संदर्भातील प्रक्रिया समजावून सांगितली. तसेच अंगणवाडी सेविका, तसेच लाभार्थी महिलांना येणाऱ्या अडचणी व शंकांचे निरसन केले.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button