
मुंबई, वृत्तसेवा: –
मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या संपूर्ण मागण्या राज्य सरकारने GR काढून मान्य केल्यानंतर गुणरत्न सदावर्ते यांनी मनोज जरांगे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. सरकारने मनोज जरांगे यांना लॉलीपॉप दिला असा दावाच गुणरत्न सदावर्ते यांनी केला.
मराठा समाजाला सरसकट ओबीसीतून आरक्षण द्यावे ही मागणी घेऊन मनोज जरांगे आझाद मैदानावर गेल्या पाच दिवसांपासून आमरण उपोषणाला बसले होते. उपोषणाच्या पाचव्या दिवशी राज्य सरकारने समाजाच्या व्यक्तीला कुणबी ठरवणारे प्रमाणपत्र देण्यासाठी सरकारने हैदराबाद गॅजेट लागू केले आहे. तसेच पुढच्या काही दिवसात सातारा गॅजेट देखील लागू करण्याचे आश्वासन सरकार तर्फे देण्यात आले आहे. मनोज जरांगे यांच्या मागण्या मान्य करून सरकारने GR शासन आदेश पारित केला यावर मनोज जरांगे पाटील यांनी समाधान देखील व्यक्त केले असले तरी, मनोज जरांगे यांना सरकारने लॉलीपॉप दिला असल्याचा दावाच वकील गुणरत्न सदावर्ते यांनी केला आहे. तसेच सरकारने काढलेल्या GR मध्ये अनेक त्रुट्या असल्याने मराठा समाजाला काहीही मिळणार नाही असा दावा सदावर्ते यांनी केला.
राज्य सरकारने मराठा समाजाच्या मागण्या मान्य केल्यानंतर गुणरत्न सदावर्ते एका माध्यमाशी बोलत होते. यावेळी त्यांनी मनोज जरांगे यांच्यावर टीका देखील केली. मनोज जरांगे यांनी मुंबई आणि महिलांना वेठीस धरले होते. त्यांनी सर्व काही केले परंतु शेवटी त्यांच्या हातात काहीच लागले नाही. मनोज जरांगे यांच्या मागण्या संविधानाला धरून नाहीत. आगामी काळात गल्लीच्या निवडणुका आहेत त्यामुळे राजकीय लोकांनी मनोज जरांगे यांचा एक शस्त्र म्हणून वापर केल्याचा दावा देखील गुणरत्न सदावर्ते यांनी केला. मनोज जरांगे यांचे उपोषण हे बेकायदेशीर होते असा पुनरुच्चारही त्यांनी यावेळी केला.