सावधान ! जळगाव जिल्ह्यात लहान मुलांच्या मदतीने चोरी करणारी टोळी पुन्हा सक्रिय
चाळीसगावनंतर आता पाचोरा शहरातील रोकड चोरीतही अल्पवयीन मुलाचा वापर !

जळगाव, वृत्तसेवा:-
जळगाव जिल्ह्यात पुन्हा एकदा लहान मुलाचा वापर करून लक्ष विचलित करत चोरी करणारी टोळी पुन्हा सक्रिय झाल्याचे उघड झाले आहे. पाचोरा शहरातील नूराणी नगर भागात सेवानिवृत्त शिक्षक शेख खलील यांच्या दुचाकीत ठेवलेली दोन लाखांची रोकड लांबविण्यात आल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे. रस्त्यावर एका अल्पवयीन मुलाने फिट आल्याचे नाटक करून शिक्षकाचे लक्ष विचलित झाले आणि दोन इसमांनी डिक्कीतील रोकड उचलून पोबारा केला. ही घटना सीसीटीव्हीत स्पष्टपणे कैद झाली आहे.
लहान मुलांच्या मदतीने लोकांचे लक्ष विचलित करून चोरी करत असल्याची चोरांच्या टोळीची मोडस ऑपरेंडी असल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी दिली आहे. पोलिस सूत्रांच्या माहितीनुसार, पाचोरा शहरात चोरी करताना दिसत असलेले तिघही संशयित आरोपींनी काही दिवसांपूर्वी अमरावती शहरातही अशाच प्रकारची चोरी केल्याचे समोर आले आहे.
याआधीही सहा महिन्यांपूर्वी चाळीसगावातील एका मंगल कार्यालयातून लग्न सोहळ्यात लहान मुलाच्या मदतीने तब्बल १० लाखांचे दागिन्यांची बॅग लांबविण्यात आली होती. त्या वेळी पोलिसांनी मध्य प्रदेशातून आरोपींना अटक करून मुद्देमाल जप्त केला होता. जिल्ह्यात वारंवार अशा घटना घडत असल्याने पोलिसांनी पुन्हा मध्य प्रदेशीय टोळीवर लक्ष केंद्रित केले असून तपासासाठी पथक रवाना करण्यात आले आहे.
Byte : डॉक्टर महेश्वर रेड्डी, पोलीस अधीक्षक, जळगाव