पाचोरा शहरात फिल्मी स्टाईलने दोन लाखांची रोकड लांबवली, संपूर्ण घटना सीसीटीव्हत कैद !
लहान मुलाने रस्त्यात पडून फिट आल्याचा बनाव करत लक्ष विचलित केले !

पाचोरा, वृत्तसेवा:-
जळगावच्या पाचोरा शहरात नूराणी नगर भागात फिल्मी स्टाईलने दोन लाखांची रोकड लंपास करण्याची घटना घडली आहे. जेडीसीसी बँकेतून मुख्याध्यापकांनी शाळेत संगणक घेण्यासाठी तसेच बांधकाम मिस्त्रीला देण्यासाठी काढलेली ही रक्कम सेवानिवृत्त शिक्षक शेख खलिल शेख नुरा यांच्या ताब्यात दिली. शेख खलील यांनी रोकड आपल्या दुचाकीच्या डिक्कीत ठेवली आणि घराकडे निघाले. शेख खलील यांनी घराच्या कंपाऊंडमध्ये दुचाकी लावताच, मागे रस्त्यावर पडून एका लहान मुलाने अचानक फिट आल्याचा बनाव केला. शेख खलिल हे तात्काळ त्या मुलाच्या दिशेने धावले. त्यामुळे दुचाकी लावलेली चावी तशीच राहिली. इतक्यात दोन इसम दुचाकीवर येऊन त्यांनी शेख खलिल यांना फिट येण्याचा बहाना करून पडलेल्या मुलासाठी पाणी आणण्यास सांगितले. शेख खलिल हे घरात जाताच चोरट्यांनी डिक्कीतील दोन लाख रुपये हातोहात उचलले आणि तिघांनी मिळून सिनेस्टाईल पळ काढला. या संपूर्ण घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले असून, पोलिसांनी अल्पवयीन मुलासह तिघांचा शोध सुरू केला आहे.