उत्तर महाराष्ट्रताज्या बातम्यामहाराष्ट्र

काळीज पिळवटणारा आक्रोश; शहीद जवान अनंतात विलीन

चार वर्षाचा मुलगा, सात वर्षाची मुलगी बापाच्या प्रेमापासून पोरके झाले


भडगांव, प्रतिनिधी:- येथील गुढे गावाचे सुपुत्र स्वप्निल सोनवणे (पाटील) हे पश्चिम बंगाल येथे भारत-बांगलादेश सीमेवर, कर्तव्य बजावत असताना वीर गतीला प्राप्त झाले होते. आज त्यांच्या मूळगावी गुढे येथे त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

काळीज पिळवटणारा आक्रोश पाहून सर्वांचे डोळे पाणावले..,

स्वर्गीय शहीद जवान स्वप्निल सोनवणे 2014 मध्ये कठीण परिश्रमातून सीमा सुरक्षा दलात (BSF)भरती झाले होते. पंजाब राज्यात खडतर प्रशिक्षण पूर्ण करून देश सेवेसाठी रुजू झाले होते, जम्मू काश्मीर, राजस्थान गुजरात, विविध राज्यांमध्ये कर्तव्य बजावल्यानंतर पश्चिम बंगाल येथे भारत-बांगलादेश सीमेवर सध्या ते कर्तव्यावर होते. नऊ ऑगस्ट शनिवार रोजी रात्री LAC वर कर्तव्य बजावत असताना त्यांना त्या ठिकाणी विजेचा धक्का बसला त्यात ते वीरगतला प्राप्त झाले. आज सकाळी त्यांचे पार्थिव गावात पोहोचल्यानंतर कुटुंबीयांचा व गावकऱ्यांचा काळीज पिळवटणारा आक्रोश बघायला मिळाला. स्वप्निल हे आई-वडिलांना एकुलते एक होते, तसेच सात वर्षांपूर्वी त्यांच्या डोक्यावरून वडिलांचे छत्र हरपले होते. आई, पत्नी, दोन बहिणी (विवाहित), एक मुलगा आणि एक मुलगी असा त्यांचा परिवार होता. संपूर्ण कुटुंबीयांची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर होती. डोक्यावरून वडिलांचे, पतीचे, मुलाचे, भावाचे, छत्र हरपल्याने कुटुंबीयांचा काळीज पिळवटणारा आक्रोश पाहून प्रत्येकाचे डोळे पाणावले.

मार्च महिन्यात स्वप्निल सोनवणे यांच्याशी घरच्यांची शेवटची भेट

मार्च महिन्यात स्वप्नील सोनवणे हे सुट्टीवर घरी आले होते. यावेळी त्यांनी कुटुंबीयांसोबत वेळ घालवला होता. सुट्टी संपल्यानंतर पुन्हा ते कर्तव्यावर हजर झाले होते. याच महिन्यात ते गणेश उत्सवासाठी सुट्ट्या घेऊन पुन्हा गावात परतणार होते. मात्र या आधीच काळाने त्यांच्यावर घाला घातला स्वप्निल यांचे पार्थिवच गावात आले, मार्च महिन्यातील स्वप्निल यांच्याशी कुटुंबीयांची तसेच मित्र परिवाराची शेवटची भेट ठरली.

शहीद जवानाला अखेरची मानवंदना देण्यासाठी हजारोंचा जनसमुदाय उसळला…

स्वप्निल सोनवणे हे गावात सर्वांनाच परिचित होते.  त्यांच्या निधनाची बातमी कळाल्यानंतर संपूर्ण पंचक्रोशीतून हळहळ व्यक्त केली जात होती. आज सकाळी त्यांचे पार्थिव त्यांच्या मूळ गुढे गावी पोहोचल्यानंतर त्यांना अखेरची मानवंदना देण्यासाठी हजारोंचा जनसमुदाय उसळल्याच पाहायला मिळालं. संपूर्ण गावात रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या तसेच सर्वत्र फुलांची सजावट करण्यात आली होती, भारत माता की जय, शहीद जवान स्वप्निल सोनवणे अमर रहे, देशभक्तीच्या गीतांनी परिसर दणाणून गेला होता.

सीमा सुरक्षा दल तसेच पोलिसांनी दिली अखेरची मानवंदना…

स्वप्निल सोनवणे हे सीमा सुरक्षा दलात कर्तव्यावर होते. कर्तव्यावर असतानाच ते वीरगतीला प्राप्त झाले. सीमा सुरक्षा दलाकडून हवेत तीन राउंड फायर करत स्वप्निल यांना अखेरची मानवंदना देण्यात आली. त्याचबरोबर पोलीस प्रशासनाने देखील हवेत तीन राऊंड फायर करत त्यांना शेवटची मानवंदना दिली. गुडे गावाच्या बाहेर तीन किलोमीटर अंतरावर शासकीय इतमामात, शोकाकुल वातावरणात स्वप्नील यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

स्वप्निल पाटील यांना वीर कुटुंबीयांचा अखेरचा सॅल्यूट शहीद जवान स्वप्निल सोनवणे (पाटील)


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button