दुष्काळी अनुदानासाठी आंदोलन करणारे माजी खासदार – आमदार आहेत लाखाच्या अनुदानाचे धनी
लाखोंची पेन्शन घेणारे माजी खासदार उन्मेष पाटील व माजी आमदार राजीव देशमुख यांनी घेतले तब्बल ९८ हजार ६०० रुपये दुष्काळी अनुदान
चाळीसगाव:-( प्रतिनिधी रणधीर जाधव )
तालुक्यातील ७० टक्के शेतकऱ्यांच्या खात्यात दुष्काळी अनुदान जमा झालेले नाही ते जमा करावे असा आरोप करत शेतकऱ्यांच्या इतर मागण्यांसाठी उद्या दि.२१ जून रोजी माजी खासदार उन्मेष पाटील व माजी आमदार राजीव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीच्या वतीने चाळीसगाव येथे शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी धरणे आंदोलन केले जाणार आहे. यात यावर्षी दुष्काळी घोषित असणाऱ्या चाळीसगाव तालुक्यातील ७० टक्के शेतकऱ्यांना अनुदान मिळाले नाही ते तत्काळ देण्यात यावे अशी प्रमुख मागणी करण्यात आली आहे.
मात्र अशी मागणी करणारे माजी खासदार – आमदार यांनीच लाखोचे अनुदान आपल्या खात्यात पाडून घेतल्याची गंभीर बाब उघड झाली आहे. माजी खासदार उन्मेष पाटील हे आधी आमदार राहिले आहेत त्यामुळे त्यांना केंद्र व राज्य शासनाकडून लाखोंची पेन्शन मिळते मात्र त्यांनी आपल्या पत्नी सौ.संपदा पाटील यांच्या नावाने ४७६०० रुपये दुष्काळी अनुदान घेतले आहे. तसेच माजी आमदार राजीव देशमुख यांना देखील पेंशन सुरु आहे त्यांनीदेखील त्यांच्या तळेगाव शिवारातील जमिनीचे ५१००० रुपये दुष्काळी अनुदान मिळविले आहे. हा प्रकार उघड झाल्याने चाळीसगाव तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.
एकीकडे लाखोंची पेन्शन व कोट्यावधींची संपत्ती असताना शेतकऱ्यांचे दुष्काळी अनुदान घेणे व दुसरीकडे त्याच शेतकऱ्यांच्या नावावर आंदोलन करणे असा दुटप्पीपणा उघड झाल्यामुळे एन आंदोलनाच्या आधी हे दोन्ही माजी खासदार आमदार तोंडघशी पडले आहेत. वास्तविक शासनाचे कुठलेही अनुदान घेणे हे आता इच्छिक आहे, लाभार्थ्यांनी नाकारलेले अनुदान गोर गरिबांसाठीच्या दुसऱ्या योजनांसाठी वापरले जाते. या दोन्ही माजी लोकप्रतिनिधी यांना हे दुष्काळी अनुदान नाकारता देखील आले असते. मात्र त्यांनी स्वतःहून महसूल प्रशासनाला बँक खाते क्रमांक देऊन त्यानंतर केवायसी प्रोसेस करून हे अनुदान आपल्या पदरात पाडून घेतले आहे. त्यामुळे उद्या त्यांनी आम्हाला हे अनुदान शासनाने न माहिती खात्यात टाकले असे सांगून अंग देखील झटकता येणार नाही आहे.
माजी खासदार उन्मेष पाटील व माजी आमदार राजीव देशमुख यांनी घेतलेले दुष्काळी अनुदान खालीलप्रमाणे.
१) संपदा उन्मेष पाटील (माजी खासदार उन्मेष पाटील यांच्या पत्नी) – गाव – दरेगाव, क्षेत्र – २.८ हेक्टर, खात्यात जमा झालेले अनुदान ४७६००/- रुपये
२) राजीव अनिल देशमुख (माजी आमदार) – गाव – तळेगाव, क्षेत्र – ३ हेक्टर, खात्यात जमा झालेले अनुदान ५१०००/-