प्रेमात अडथळा प्रियकराच्या मदतीने पत्नीने काढला पतीचा काटा
कोदगाव शिवारातील घटना प्रियकरासह पत्नीला पोलिसांकडून अटक
(चाळीसगाव:- प्रतिनिधी, रणधीर जाधव)
पतीच्या नियमित होणाऱ्या त्रासाला कंटाळून पत्नीने चुलत दिराशी प्रेम संबंध ठेवले. या प्रेमसंबंधात अडथळा निर्माण होईल म्हणून पत्नीने दिराच्या मदतीने पतीलाच संपवले. दिराच्या मदतीने पतीच्या पोटावर धारदार ब्लेडने वार करून तसेच दगड डोक्यात घालून खून केला व पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने पतीचा मृतदेह अपघात वाटावा म्हणून कोदगाव शिवारातील महामार्गावर टाकून दिला. हा खळबळ जनक प्रकार समोर आल्यानंतर चाळीसगाव पोलिसांनी शिताफने तपास करून मयताच्या पत्नीला ताब्यात घेतल्यानंतर या खुनाचे रहस्य उलगडले. पतीचा खून करणाऱ्या पत्नीसह तीच्या प्रियकरावर चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
असा घडला खुनाचा घटनाक्रम……
घटनेची माहिती अशी की, मंगळवार 18 रोजी रात्री दहा वाजून 45 मिनिटांच्या सुमारास राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 52 कोदगाव शिवारात कुणाल बुंदेलखंडी यांच्या शेताजवळ बाळू सिताराम पवार राहणार गवळीवाडा, न्यायडोंगरी, तालुका नांदगाव याचा मृतदेह आढळून आला. कोणत्यातरी वाहनाने धडक दिल्याने त्याचा मृत्यू झाला असावा अशी शक्यता धरून चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
पोलिसांचा संशय बळावल्याने लागला खुनाचा तपास
मात्र बाळू पवार यांच्या मृत्यू बाबत पोलिसांना शंका आल्याने पोलिसांनी फॉरेन्सिक टीमला पाचारण केले. घटनास्थळी रक्ताने माखलेला दगड मिळून आला बाळू पवार यांच्या शरीरावर ब्लेड व दगडाने वार केल्याच्या खुणा आढळून आल्या दगड व ब्लेडने गंभीर दुखापत करून त्याचा खून केल्याचे प्रथमदर्शी दिसून आले.
पोलिसांनी मयत इसमाच्या नाव व पत्त्यावरून त्याच्या नातेवाईकाचा शोध सुरू केला. तपासात बाळू हा त्याची पत्नी वंदना बाळू पवार हिच्या सोबत शिर्डी येथे कामाला गेल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी तिच्या मोबाईल वरून संपर्क साधला असता ती शिर्डी येथे असल्याचे तर पती बाळू पवार हा न्यायडोंगरी येथे गेल्याचे सांगत मोबाईल बंद केले. तेथेच पोलिसांना शंकेची पाल चुकचुकली. पोलिसांनी मोबाईल क्रमांकाच्या आधारे व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे वंदना पवार हिचे लोकेशन घेतले असता ती चाळीसगाव रेल्वे स्टेशन परिसरात असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी तिचा शोध घेऊन तिला ताब्यात घेतले तिचे वर्तन संशयास्पद वाटत असल्याने पोलिसांनी तिला बोलते केले असता पतीच्या खुनाची कबुलीच तिने दिली.
वंदना हिचा विवाह बाळू पवार याच्याशी 13-14 वर्षांपूर्वी झाला होता. तो दारू पिऊन शिवीगाळ करीत वंदनाला मारहाण करत असे. या त्रासाला कंटाळून वंदनाने तिचा चुलत दिर गजानन राजेंद्र पवार यांच्याशी प्रेमाचे सूत जुळवले. याच दरम्यान दोघांनी बाळू पवार याचा गेम करण्याचा कट रचला. ठरल्याप्रमाणे दिनांक 18 रोजी बाळू पवार हा शिर्डी येथून रेल्वेने उतरला त्याला गजानन पवार यांच्या दुचाकीवर बसवून भडगाव रोडवरील एका हॉटेलमध्ये मनसोक्त दारू पाजली तेथे जेवण खाऊ घातले नंतर अंधाराचा फायदा घेऊन वंदनाने पती बाळू याला मला माझ्या माहेरी कन्नड येथे जायचे आहे असे सांगून दुचाकी वरून हिरापूर रोडने खडकी बायपास व तेथून कोतगाव परिसरात आणले. जास्त प्रमाणात दारू पिल्याने बाळू पवार यास काही सुचत नव्हते. ही संधी साधत वंदनाने तिच्या जवळील ब्लेडने वाळूच्या पोटावर वार केले. त्याचवेळी गजाननने बाजूला पडलेला भला मोठा दगड चेहऱ्यावर मारला. तो गंभीर होऊन त्याच्या शरीरातून अति रक्तस्त्राव निघू लागल्याने त्याची हालचाल होत नाही असे दिसताच बाळूचा मृतदेह ओढत नेत महामार्गावर टाकून दिला. ओळख पटविण्यासाठी त्याचे आधार कार्ड खिशात ठेवले. नंतर गजानन याने वंदना हिला दुचाकीवरून चाळीसगाव रेल्वे स्थानकावर सोडले व गजानन हा न्यायडोंगरी येथे निघून गेला.
पतीच्या नेहमीच्या जाचाला कंटाळून वंदना हिच्या आणि तिचा दीर गजानन पवार यांच्या प्रेम संबंधात अडथळा निर्माण होईल म्हणून या दोघांनी बाळू पवार याचा खून केल्याचे वंदना हिने पोलिसांना सांगितले. याप्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर ढिकले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वंदना बाळू पवार व गजानन राजेंद्र पवार या दोघांच्या विरोधात भादंवि कलम 302,201,120-ब, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.