पाटणादेवी येथील गणित नगरीचे आश्वासन हवेतच…
खोटी आश्वासन विधानसभेचे गणित बिघडवणार ?

चाळीसगाव – (प्रतिनिधी रणधीर जाधव) गणित विषयातील सर्वोत्तम रत्न म्हणजे भास्कराचार्य होय. त्यांनी गणितासह खगोलशास्त्रासह अनेक ज्ञानशाखांमध्ये दिलेले योगदान बहुमोल आहे. शून्याचा शोध भास्कराचार्यांनी लावला. त्यांच्या कार्याने ओळखल्या जाणाऱ्या पाटणादेवी परिसराची ओळख गणित नगरी उभारण्याच्या घोषणा फक्त हवेतच राहिल्या. तत्कालीन आमदार व माजी खासदार उन्मेष पाटील यांनी गणित नगरीचा फक्त राजकीय देखावा उभा केला अशी चर्चा सध्या जनमानसात केली जात आहे. वास्तविक गणित नगरीची एक वीटही गेल्या दहा वर्षांमध्ये रचली गेली नाही. जिथे शून्याचा शोध लागला त्या परिसराच्या विकासासाठी गेल्या १० वर्षात शून्यच मिळाला हे जळजळीत वास्तव समोर येत आहे.
पाटणादेवी येथे गणित नगरी होणार असा झाला होता गाजावाजा…..
2015 साली पाटणादेवी परिसरामध्ये भव्य गणित संमेलन घेऊन मोठा गाजावाजा करून भास्कराचार्यांच्या नावाने गणित नगरी बांधण्याची भीष्मप्रतिज्ञा मोठ्या आवेशात उन्मेष पाटील यांनी केली. पाटणादेवी परिसर हा भास्कराचार्यांची जन्मभूमी व कर्मभूमी म्हणुन या परिसराचा खऱ्या अर्थाने विकास झाला पाहिजे अशी सामान्य माणसांची सुद्धा इच्छा होती. गणित नगरी या संकल्पनेला सर्व स्तरातून भरभरून प्रतिसाद मिळाला. गणित नगरी च्या माध्यमातून पाटणादेवी पर्यटन दृष्ट्या सक्षम होईल. वेरूळ, अजिंठाला येणारा पर्यटक ऐतिहासिक व धार्मिक दृष्ट्या महत्त्वाच्या असणाऱ्या पाटणादेवी ला सुद्धा येईल. या भावनेतून गणित नगरीचे स्वागत सर्व स्तरातून झाले…..
पाटणादेवी येथे गणित नगरी होणार हा राजकीय स्टंट होता का ?
मात्र गणित नगरी हा फक्त राजकीय कार्यक्रम म्हणून राबवला गेला. मात्र समर्पक असा प्रस्तावच पाठवला न गेल्याने कुठल्याही स्वरूपाची तरतूद राज्य शासनाकडून व केंद्र शासनाकडून केली गेली नाही. आश्वासनांचा पाऊस व राजकीय स्टंट या भोवतीच गणित नगरी फिरत राहिली. आजही पाटणादेवीचा परिसर व सबंध चाळीसगाव तालुक्यातील नागरिक गणित नगरीची अपेक्षा ठेवून आहेत.
आमदार मंगेश चव्हाण यांनी नियमात न बसणारे प्रकल्प तालुक्यात आणले…..
चाळीसगाव मतदारसंघाचे आमदार मंगेश चव्हाण यांनी आपल्या कार्यकाळात उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, उपजिल्हा रुग्णालय आदी अनेक बाबी विशेष बाब म्हणून नियमात बसत नसताना देखील मंजूर करून आणले आहेत मात्र गणित नगरी या विषयावर त्यांनी आजतागायत एक शब्द उच्चारला नसल्याने ते गणित नगरी हा विषय मार्गी लावतील की नाही ? असा प्रश्न जनसामान्यांमधून उठत आहे.
एक मात्र नक्की की, गणित नगरीचे गणित जरी गेल्या १० वर्षात आजीमाजी लोकप्रतिनिधी यांच्याकडून सुटले नसले तरी काही महिन्यातच होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत हा विषय अनेकांची गणिते बिघडवू शकतो हे मात्र नक्की…..