जळगाव जिल्ह्यातील या तालुक्यात सर्वाधिक टँकरने पाणीपुरवठा
३५ गावांमध्ये पाणीटंचाईचे सावट, टॕन्करची संख्या पोहचली ४६ वर
चाळीसगांव- (प्रतिनिधी दिपक कुमावत)
तालुक्यातील १४३ पैकी ३५ गावांमध्ये जलसंकट तीव्र झाले असून पाण्याचे ४६ टॕन्कर सुरु झाले आहेत. जूनच्या पहिल्या पंधरवाड्यापर्यंत टंचाईग्रस्त गावांची संख्या ५० पर्यंत पोहचण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केले आहे. गेल्यावर्षी अत्यल्प पर्जन्यमान झाल्यामुळे तालुक्यातील १४ मध्यम प्रकल्पांसोबतच मन्याड मध्येही पाण्याचा साठा शिल्लक नाही. दरम्यान याअभुतपूर्व पाणीबाणीचा सामना करण्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. प्रशासनाकडून ४६ विहीरी अधिग्रहीत करण्यात आल्या आहे.
– गेल्या वर्षी चाळीसगाव तालुक्यात कमी पर्जन्यमान
गेल्यावर्षी चाळीसगाव तालुक्यावर वरुणराजाची कृपा बरसलीच नाही. तालुक्यात अवघे ४६४ मिमी पर्जन्यमान झाले. विशेषबाब म्हणजे भर पावसाळ्यातील पावसाची गैरहजेरी ४० दिवसांहून अधिक होती. याचा थेट परिणाम ग्रामीण भागातील जलस्रोत कोरडेठाक पडण्यावर झाला असून ३५ गावांच्या घश्याला कोरड पडली आहे. भूजल पातळी खालावल्याने विहीरींनी तळ गाठले आहे. हातपंपही दम तोडायला लागले असून ग्रामीण भागात जनावरांच्या चा-याचाही प्रश्न उग्र झाला आहे. शासनाने तालुक्यात गंभीर दुष्काळ जाहीर झाल्याने केंद्रीय पथकाकडून पाहणी झाली आहे. दुष्काळग्रस्तांना मदत मिळत असली तरी, पाणीटंचाईचे चटकेही बसू लागले आहे.
– तालुक्यातील या ३५ गावांमध्ये जलसंकट तीव्र
विसापूर तांडा, अंधारी, करजगाव, कृष्णनगर, हातगाव, हिरापूर, तमगव्हाण, रोहिणी, राजदेहरे, ब्राम्हणशेवगे, घोडेगाव, हातगाव भील्लवस्ती, खराडी, डोणदिगर, पिंप्री बु.प्र.दे., तळेगाव, न्हावे, ढोमणे, माळशेवगे, पिंपळगाव, शिंदी, शेवरी, बिलाखेड, शिरसगाव, जुनपाणी, पिंपळवाड निकुंभ, चिंचगव्हाण, सुंदर नगर, अभोणे तांडा, बोढरे, गणेशपूर आदी ३५ गावांमध्ये भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. सद्यस्थितीत ३५ गावांना ४६ टॕन्कर पाणी दिले जात असून तळेगाव, कृष्णनगर या गावांमध्ये पाणीटंचाईची तीव्रता अधिक आहे.
प्रशासनाकडून पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी ४६ विहीरी अधिग्रहीत करण्यात आल्या आहेत. परिसरातील पाणीपुरवठ्यास योग्य असणारे नैसर्गिक स्रोत शोधले जात आहे. विहीरी अधिग्रहीत करण्यात आल्या असून येथून टॕन्करने पाणीपुरवठा केला जात आहे.यावर्षी भीषण दुष्काळ असल्याने पाणीटंचाईची स्थिती गंभीर झाली आहे. मात्र प्रशासनाने यावर मात करण्यासाठी नियोजन केले आहे. जूनच्या सुरुवातीला टंचाईग्रस्त गावांची संख्या ५० पेक्षा अधिक होणार आहे. या गावांमध्ये एकाचवेळी पिण्याचे पाणी, जनावरांसाठी चारा आदि प्रश्न ऐरणीवर येणार आहेत. ही स्थिती लक्षात घेऊन नियोजन केले जात आहे. अशी माहिती गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर यांनी दिली आहे.
– गिरणात अवघा २० टक्के जलसाठा शिल्लक
निम्म्या जिल्ह्यास नांदगाव, मालेगाव व चाळीसगाव औद्योगिक वसाहतीस पाणीपुरवठा करणा-या गिरणा धरणात गुरुवार अखेर २० टक्के जलसाठा शिल्लक आहे. १८२ हून अधिक पाणीपुरवठा योजनांसाठी गिरणा धरण हाच एकमेव जलस्रोत आहे. पाऊस लांबल्यास हे संकट अधिक तीव्र होणार आहे. आता सर्वांच्याच नजरा मान्सून कडे लागले आहे.